महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

महाराष्ट्र पोलिसांचा दणका; सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस कडक पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडलेल्या तीन माजी आमदारांविरोधात अकोल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यात २ डिसेंबरला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा शहरातील स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चात सुमारे ३०० ते ४०० आंदोलक सहभागी झाले होते. या मोर्चात सोशल डिन्स्टन्सिंगच्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे ३ माजी आमदार यांच्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मोर्चाचे आयोजन करणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणे यामुळे कलम १८८, २६९, भादंवि १३५ बीपी ACT तसेच साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह मोर्च्यांतील ३३ जणांचा समावेश आहे. या साऱ्यांविरोधात कोरोनासंबंधीचे नियम न पाळल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक शहरात लॉकडाउनचे नियम पुन्हा कडक होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचे निर्देश सरकारकडून वारंवार दिले जात आहेत. अशा परिस्थितीत नियमांचं पालन न केल्यावर महाराष्ट्र पोलिस कडक कारवाई करत असल्याचे दिसत आहे.