दिलासादायक! केंद्राचा मोठा निर्णय; रेमडिसिव्हिरवरील आयात शुल्क रद्द
देश बातमी

दिलासादायक! केंद्राचा मोठा निर्णय; रेमडिसिव्हिरवरील आयात शुल्क रद्द

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे, याचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात काळा बाजारही होऊ लागल्याचे दिसून येत असताना आता केंद्र सरकारनं एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या इंजेक्शनासाठी लागणाऱ्या औषधी सामग्रीवरील आयात शुल्क हटवण्यात आले आहेत. यामुळे इंजेक्शनचं देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यात आणि तुटवडा कमी करण्यात मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ याची कमतरताच दूर होणार नाही तर किंमतही कमी होईल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महसूल विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ज्या वस्तूंवर शुल्क माफ केले आहे त्यात रेमेडिसवीर, रेमेडिसवीर इंजेक्शन्स आणि बीटा सायक्लोडोडक्स्ट्रिनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य (एपीआय) यांचा समावेश आहे. आयात शुल्कात ही सूट 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या आयातीवर कोणतीही फी आकारली जाणार नाही. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनची आयातही शुल्कमुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेने हे औषध येत्या काळात देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.