विदर्भ हादरला ! ३० लाखांच्या खंडणीसाठी अभियंत्याला अपहरण करून जिवंत जाळलं
बातमी विदेश

विदर्भ हादरला ! ३० लाखांच्या खंडणीसाठी अभियंत्याला अपहरण करून जिवंत जाळलं

चंद्रपुर : चंद्रपुर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेमुळे विदर्भ हादरला आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्घुस येथील वेकोली रामनगर वसाहतीत राहणारा तरुण अभियंता शुभम फुटाणे (२५) याची अपहरण करून, २८ दिवसानंतर ३० लाखांच्या खंडणीसाठी जिवंत जाळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपी गणेश पिंपळशेंडे याला अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुभम फुटाणे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातोय, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने शुभमच्या आईला फोन करून, शुभमचे अपहरण केले असल्याची माहिती दिली होती. तसेच ३० लाखांची खंडणी देखील मागितली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी घुग्घुस येथील डॉ. दास यांच्या रूग्णालयाजवळ शुभमची मोटरसायकल आढळली होती. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, घुग्घुस पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांचा संशय एका व्यक्तीवर होता. त्याच्यावर पाळत ठेवली गेली. वाहनावरील रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमूने तपासले असता त्यात साम्य आढळले. आरोपीची चौकशी केली असता व घराची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ठाणेदार राहुल गांगूर्डे यांनी घुग्घुस लगतच्या स्वागत लॉन येथे आरोपी पिंपळशेंडे याला नेले असता शुभम फुटाणे याचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अधिक तपासासाठी पोलिसांनी शुभमच्या डोक्याची कवटी हस्तगत केली आहे. तर, जाळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आणखी बरीच माहिती समोर येईल, असे घुग्घुस पोलिसांनी सांगितले आहे.