धोकादायक! चीनमध्ये कोरोनानं पुन्हा वर काढलं डोकं; कडक निर्बंध लागू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धोकादायक! चीनमध्ये कोरोनानं पुन्हा वर काढलं डोकं; कडक निर्बंध लागू

नवी दिल्ली : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात हा विषाणू पसरला. असं असताना गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोना रुग्णसंख्या कमी झाली होती. त्यानंतर मात्र एक धोकादायक बातमी समोर आली असून चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

फुजियानमधील पुतियान शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोनाचं संकट पाहता शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेंबरला ५९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. १२ सप्टेंबर रुग्णसंख्या ही २२ इतकी होती. आता रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावलं उचलली नाहीत तर करोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अवघ्या चार दिवसात ५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या फुजियान भागात १०२ रुग्ण आढळले आहेत. १ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सुट्ट्या सुरु होत आहेत. पर्यटनासाठी पर्यटक फुजियानला मोठ्या संख्येने येतात. मात्र कोरोना रुग्णांची संख्या पाहता यावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्याचा पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे.