जळगावमध्ये कोसळलं खासगी हेलिकॉप्टर; वैमानिकाचा मृत्यू
उत्तर महाराष्ट् बातमी

जळगावमध्ये कोसळलं खासगी हेलिकॉप्टर; वैमानिकाचा मृत्यू

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात एक खासगी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली असून घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. हे हेलिकॉप्टर NMIMSचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे वैमानिक नसरूद अनिम (वय ३०) यांचा मृत्यू झाला असून शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर (वय २१) गंभीर जखमी झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुपारी ४च्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं. अंशिका गुजर यांना दुर्घटनाग्रस्त विमानातून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे.

अपघातग्रस्त विमान हे शिरपूर येथून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच वर्डी शिवारात कोसळले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाला असण्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी शिकाऊ महिला वैमानिकास मुंबई येथे पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.