ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळल्याने मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात उद्या (ता. २२) पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे. २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालवाधीत ही संचारबंदी लागू असणार आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.