चाकणच्या कंपनीतील ट्रिपला गेलेली बस पसरणी घाटात पलटली
पुणे बातमी

चाकणच्या कंपनीतील ट्रिपला गेलेली बस पसरणी घाटात पलटली

वाई : चाकण येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन वार्षिक सहलीसाठी निघालेली बस पसरणी घाटात पलटी झाली आहे. पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात ब्रेकफेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून अवघड वळणावर बस उलटली, या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या बसमधून एकूण ३४ प्रवासी प्रवास करत होते. प्रतापगड-महाबळेश्वर येथे सहलीसाठी ही खासगी बस गुरुवारी येथे आली होती. सायंकाळी पावणेसातच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला असताना पाचगणी-वाई रस्त्यावरील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ एका अवघड वळणावर उतारावर ब्रेकफेल झाल्याने बस रस्त्यावरच उलटली.

चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवितहानी घडली असती. यामुळे बसमधील प्रवासांमध्ये एकच गोंधळ उडाला. अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत तर अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षीक सहलीची ही बस आहे.