काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन
पश्चिम महाराष्ट्र बातमी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. सातारा येथे सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या जाण्याने सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (४ जानेवारी) उंडाळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विलासकाका उंडाळकर हे ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे आमदार होते. अनेक सहकारी संस्थाच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. सहकार मंत्री म्हणून त्यांनी १२ वर्ष काम केलं होतं. विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात झालं. तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमधून पूर्ण केलं. यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.

विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन दुःखदायक आहे. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील लोकाभिमुख नेतृत्व हरपले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या आहेत.

विलासकाकांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्वं केलं. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.