चक्रीवादळ धडकले गोव्यात; कर्नाटकात चार जणांचा मृत्यू
देश बातमी

चक्रीवादळ धडकले गोव्यात; कर्नाटकात चार जणांचा मृत्यू

पणजी : अरबी समुद्रात तयार झालेले तौते चक्रीवादळ गोव्यात धडकले असून वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठंमोठी झाडं रस्त्यावर मूळासकट उखडून फेकली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून, मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत असून दुपारपर्यंत चक्रीवादळाचं केंद्र उत्तर, उत्तर पश्चिम गोवा केंद्र असेल, असं अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. त्यानंतर चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर पाऊल ठेवलं. चक्रीवादळामुळे गोव्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वाहनांवरही झाडं कोसळी आहेत असल्यानं वाहनांचं नुकसान झालं आहे.

चक्रीवादळाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला फटका बसला आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ३३ केव्ही विद्युत वाहक तारांवर झाडं कोसळल्यानं रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र, जनरेटरच्या मदतीने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. सध्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असून, विनाअडथळा ऑक्सिजन पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.