दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन
बातमी महाराष्ट्र

दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे वडिल विठोबा भरणे यांचं निधन झालं आहे. ते 90 वर्षांचे होते. पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यमंत्री भरणे यांनी स्वत: ट्विट करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. विठोबा भरणे यांच्यावर आज बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इंदापूर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी म्हणजेच भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

“आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आमचे वडील तिर्थरूप विठोबा (तात्या) भरणे यांचे आज दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवार दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता मूळगावी भरणेवाडी ता.इंदापूर जि. पुणे येथे अंत्यविधी होणार आहे”, अशी माहिती भरणे यांनी ट्विटद्वारे दिलीय.

प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची ओळख असणारे विठोबा भरणे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. इंदापूर तालुक्यात तात्या नावाने ते ओळखले जायचे. मंत्री भरणे यांच्या आयुष्यात तात्यांचं स्थान फार महत्त्वाचं होतं. त्यांच्या जडणघडणीत तात्यांचा मोठा वाटा राहिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अंत्यविधीला उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील आमदार सोलापूर जिल्ह्यातील आमदार, बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक यश-अपयशात माझ्या पाठीशी असलेला तात्यांचा आधार अचानक हरपल्याने मन विषण्ण झाले आहे. पितृछत्र हरपल्याने माझ्या जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, अशा भावना यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केल्या.