९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय
बातमी महाराष्ट्र

९ डिसेंबर २०२० : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आजचे निर्णय

मुंबई : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले आजचे महत्वाचे निर्णय
१) मालमत्तांवर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारांसाठी मुद्रांक शुल्क कमी करण्याचा तसेच त्यामध्ये एकसमानता आणण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे यापुढे सामान्य नागरिक, झोपडपट्टीधारक, शेतकरी तसेच अन्य असंघटित घटक ज्यांच्याकडे नोंदणीकृत दस्त नाही परंतु, सात-बारा किंवा मिळकत प्रमाणपत्राचा पुरावा आहे. अशा घटकाला त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेच्या टायटल तथा पुराव्याच्या आधारावर कर्ज घेण्यासाठी नोंदणी करावयाच्या करारनाम्यावर कमी मुद्रांक शुल्क द्यावे लागणार आहे.

२) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

३) कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे डी.वाय.पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव विधानमंडळात मांडण्यात येईल.

४) आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या प्रारुप विधेयकास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती. हे विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल.