मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ऑनलाईन गंडा; ओएलएक्सवर ३४ हजारांची फसवणूक
देश बातमी

मुख्यमंत्र्यांच्या मुलीला ऑनलाईन गंडा; ओएलएक्सवर ३४ हजारांची फसवणूक

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ओएलएक्सवर ऑनलाइन सोफा विकताना फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या ऑनलाइन चोरांनी 34 हजार रुपये लंपास केले आहेत. जुना सोफा ऑनलाइन विकताना ही घटना घडली आहे. या भामट्यांनी सुरुवातीला ग्राहक म्हणून ओळख करून दिली. खात्री पटावी याकरता सुरुवातीला त्यांनी केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिच्या खात्यात काही पैसे देखील पाठवले. मात्र सोफ्याची विक्री झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये पैसे न येता तिच्या खात्यामधून 34,000 रुपये कापले गेल्याचा मेसेज आला. याबाबत तिने रीतसर तक्रार नोंदवली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी आरोपीकडून क्यूआर कोडचा वापर केला होता. पैसे पाठवण्यासाठी त्याने हर्षिताला एक क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. मात्र त्या खात्यात पैसे येण्याऐवजी तिचेच पैसे कापले गेले. तिने जेव्हा अशी माहिती दिली की चुकीचा क्यूआर कोड पाठवला आहे, तेव्हा त्या भामट्याने आणखी एक क्यूआर कोड पाठवला. असेही सांगितले की हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे पैसे परत येतील आणि तुमच्याबरोबर निश्चित झालेली सोफ्याची किंमतही तुम्हाला मिळेल. हर्षिताने तो कोड स्कॅन केल्यानंतर तिच्या खात्यातून पुन्हा एकदा पैसे कापले गेले.

दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीबरोबर झालेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली आहे. अशी माहिती मिळते आहे की दिल्ली पोलिसांच्या नॉर्थ जिल्ह्यातील सायबर सेल या प्रकरणाची चौकशी करत आहे. हे हायप्रोफाइल प्रकरण असल्यामुळे लवकरच यातील आरोपी पकडला जाण्याची शक्यता आहे.