सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी ‘या’ नावाची चर्चा
बातमी महाराष्ट्र

सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी ‘या’ नावाची चर्चा

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांची बदलीनंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी अनेक वरिष्ठ आयपीएस आधिकारी मैदानात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, सुबोधकुमार जयस्वाल यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल याबाबतच्या गृह मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत या नियुक्तीचा कार्यकाळ असणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची सूत्रे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांच्या हाती सोपवणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

सुबोध जयस्वाल यांच्या जागी वरिष्ठ असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम किंवा गृहनिर्माण पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र १९८७ बॅचमधील कनकरत्नम हे उद्या ३१ डिसेंबर २०२० रोजी निवृत्त होत आहेत. तर बिपीन बिहारी हे मार्च २०२१ मध्ये निवृत्त होत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारला आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय पांडे, पोलीस महासंचालक, होमगार्ड, हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक, लीगल अँड टेक्निकल, सुरेंद्र कुमार पांडे, महासंचालक, जेल विभाग, रजनीश सेठ, पोलीस महासंचालक, एसीबी, महाराष्ट्र राज्य या चार अधिकाऱ्यांपैकी एकाची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करावी लागणार आहे.

कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. परंतु पांडे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंची वर्णी निश्चित मानली जाते. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत नगराळे यांची कारकीर्द
नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.