स्पुटनिक व्हीचा देण्यात आला पहिला डोस; जाणून घ्या एका डोसची किंमत?
देश बातमी

स्पुटनिक व्हीचा देण्यात आला पहिला डोस; जाणून घ्या एका डोसची किंमत?

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रशियामध्ये निर्मिती करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस भारतीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध होणार आहे. स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असून लशीची पहिली खेप भारतात आली आहे. दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. कालच्या या घोषणेनंतर आज डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीच्या माध्यमातून आज या लसीचा पहिला डोस हैद्राबादमध्ये दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीने रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडशी करार केला असून त्याअंतर्गत हा डोस देण्यात आला आहे. यावेळी कंपनीने लसीच्या किंमतीची घोषणा केली असून लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार असल्याने एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मर्यादित संख्येत आम्ही ही लस देत असून हे लसीचं सॉफ्ट लॉन्चिंग सुरु झालं आहे. पहिली लस आज १४ मे २०२१ रोजी हैद्राबादमध्ये देण्यात आली, असं रेड्डीज लॅबोरेट्रीने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. तसेच या लसीची किंमत ९४८ रुपये आणि पाच टक्के जीएसटी इतकी असणार आहे. स्थानिक पातळीवर पुरवठा सुरु होईल तेव्हा लसीची किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असंही रेड्डीज लॅबोरेट्रीने स्पष्ट केलं आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भरतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. त्यादरम्यान दुसरीकडे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातूनही या लसींची निर्मिती केली जाणार आहे. कंपनी सध्या भारतातील सहा कंपन्यांसोबत ही लस बनवण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे सांगण्यात आलं आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस ९० टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.