कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम
कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर ब्रिटनहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमान वाहतुकीवरील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता ३१ डिसेंबरपर्यंत हवाई वाहतूक बंदीचा निर्णय ७ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो, अशी माहिती वैज्ञानिकांनी दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र, लोकांना दिली जाणारी कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.

ब्रिटन, अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये या नव्या स्ट्रेनमुळे कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आता भारतात हातपाय पसरत असल्याचं दिसू लागलं आहे. काल दिवसभरात देशाच्या विविध भागांमध्ये ६ जणांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र ब्रिटनहून आलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने आता आरोग्य विभागाची धाकधूक वाढली आहे. त्यातच ब्रिटनहून आलेल्या अनेक प्रवाशांशी संपर्क होत असल्यानं चिंतेत भर पडली आहे.

या पार्श्वभूमीवर ब्रिटनहून भारताकडे येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू झाली. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू होता. मात्र नव्या स्ट्रेनचा धोका कायम असल्यानं या बंदीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता ७ जानेवारीपर्यंत भारत आणि ब्रिटनमधील हवाई वाहतूक बंद असेल. असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.