म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस
बातमी महाराष्ट्र

म्हणून मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पडतोय पाऊस

मुंबई : मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी तुरळक पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.

ऐन थंडीत का पडतोय पाऊस?
ऐन हिवाळ्याच्या मोसमात पाऊस का पडत आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे. बुरेवी चक्रीवादळामुळे अरबी समुद्राच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे काही भागात ढगाळ हवामान होत आहे. दरम्यान बंगाल उपसागराच्या काही भागात पुन्हा चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तेथे उंचीवरून वारे वाहत आहेत. त्यामुळे दक्षिणेकडील समुद्रामध्ये नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबरच्या सुरुवातीपासून चक्रीवादळाची मालिका सुरु असून थंड वातावरण आहे. यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे.