प्रदीप शर्मांबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
बातमी मुंबई

प्रदीप शर्मांबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं १७ जूनला एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्याबाबत न्यायालयानं मोठा निर्णय दिला असून त्यांच्यासह संतोष शेलार, आनंद जाधव या दोन आरोपींना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने काही दिवसांपूर्वीच माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक केली होती. स्फोटके पेरणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या, या दोन्ही प्रकरणांत शर्मा यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या अटकेनंतर एनआयएने या तपासाचा वेग वाढवला होता. सुरुवातीला मनसुख हत्येत प्रत्यक्ष सहभागप्रकरणी संतोष शेलार, आनंद जाधव या दोन तरुणांना लातूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लोणावळा येथील अ‍ॅम्बी व्हॅली येथून शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या.

ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली होती. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली होती.