धक्कादायक ! राज्याच्या माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन
बातमी विदर्भ

धक्कादायक ! राज्याच्या माजी मंत्र्यांचे कोरोनामुळे निधन

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यातून कोणीही सुटताना दिसत नाहीये. राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार संजय देवतळे यांचे आज (ता. २५) नागपुरात कोरोनावरील उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मृदू स्वभावाचे राजकारणी अशी संजय देवतळे यांची ओळख होती. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. सलग २० वर्ष त्यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तिथून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली होती.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा शिवसेनेत असलेले काँग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांनी २ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपासून ते नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.