अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
बातमी महाराष्ट्र

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिक: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना संसर्गामुळे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही असं महामंडळाने ठरवलं होतं. मात्र नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाची लागण कमी कमी होत गेली. डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता साहित्य महामंडळाने ९४ वे साहित्य संमेलन २६, २७, २८ मार्च रोजी नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. मात्र जानेवारीच्या अखेरीस पुन्हा राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला.

विशेष म्हणजे यावेळी ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने साहित्य संमेलन कसे होणार यावर उलटसुलट चर्चा सुरू होत्या. तसेच कोरोनाचा उद्रेक पाहता संमेलनाचा अट्टाहास कशासाठी, असा सवालही साहित्य वर्तुळातून केला जात होता.कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही म्हणून कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावरच नाशिकच्या स्वागतमंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून हे संमेलन कधी घेता येईल, असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले.

94 व्या साहित्य संमेनलानाची तयारी जोरदार सुरु होती. निधी संकलन आणि इतर तयारीला वेग आला होता. मात्र कोरोनाने डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली, मात्र कोरोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नाशिक शहरात कुठल्याही प्रकारच्या धार्मिक किंवा सामाजिक सोहळ्यांच्या आयोजनास परवानगी नाही. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात संचारबंदीदेखील लागू आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर आहे .