पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एकाच हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह आणखी काही शस्त्रे जप्त केली आहेत. या घटनेतील आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेमुळे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं आहे. या कुटुंबातील प्रमुख राम चंद 35-36 वर्षांचे होते आणि ते बराच काळापासून टेलरचं दुकान चालवत होते. राम चंद आणि त्यांचे कुटुंब एक अतिशय शांत आणि आनंदी जीवन जगत होते. अशा परिस्थितीत ही घटना सर्वांसाठी धक्कादायक आहे. असे मत रहीम यार खान येथील सामाजिक कार्यकर्ते बिरबल दास यांनी व्यक्त केले आहे.

पाकिस्तानमध्ये 1947 पासून अल्पसंख्याक हिंदू आणि शीखांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्याक हिंदू आणि शीख यांच्यावरील अत्याचाराच्या घटना पाकिस्तानमध्ये सतत वाढत आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कराचीमधील एका हिंदू डॉक्टरचीही अज्ञात लोकांनी निर्घृण हत्या केली होती. लाल चंद बागरी असं या डॉक्टरचे नाव होतं. ते सिंध प्रांतातील टंडो अलिहार येथे प्रॅक्टिस करत होते.

तर याहून  धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यात सिंध प्रांतात एका पोलिसानेच एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्याही निकाह केला. याठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते हिंदू-शीख या विषयावर बर्‍याच काळापासून आवाज उठवत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.