पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन
बातमी मुंबई

पाचवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्याचे निधन

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी खासदार मोहन रावले यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोहन रावले यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय मानले जात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी परळ लालबागमध्ये जे कडवट शिवसैनिक निर्माण केले, त्यातील मोहन रावले हे पहिल्या फळीचे शिवसैनिक होते, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मोहन रावले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. गोव्यात काही कामा निमित्त ते गेले होते. त्यावेळी त्यांचं निधन झालं. मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आज आणलं जाणार आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे ते पहिले अध्यक्ष होते. रावले हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून तब्बल पाच वेळा निवडून आले होते.

शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील, असं वाटलं नव्हते. परळ ब्रँड शिवसैनिक हिच त्यांची ओळख होती, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मोहन रावले यांचा शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता. दक्षिण मुंबईत खऱ्या अर्थानं शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.