कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाच्या नव्या प्रकाराची दहशत; ब्रिटनमधून येणारी विमाने रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : एकीकडे जीवघेण्या करोना व्हायरससाठी आता कुठे लस बाजारात येण्याची चिन्हे असतानाच करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे ब्रिटनच्या शेजारील आणि युरोपीयन देश सतर्क झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतातील केंद्र सरकारनेही खबरदारीचा पर्याय म्हणून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. युकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने तिथे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लॉकडाउन पुन्हा एकदा लागू केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिथल्या विमानांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना कोरोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

ब्रिटनमध्ये मागील काही दिवसांपासून नव्या प्रकारच्या संसर्गाने बाधित झालेल्यांची संख्या वाढत आहे. नव्या प्रकारच्या विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातली आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे. परिणामी कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, आयलँड, बुल्गेरिया आणि सौदी अरेबिया या देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या विमानांवर तात्पुरती बंदी घातली आहे.