कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन
कोकण बातमी

कोकणातील काँग्रेसनेत्याचे कोरोनामुळे निधन

महाड : महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार काँग्रेसनेते माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघेल.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रायगड जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडे होतं. १९९९मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली, त्यावेळी ते राष्ट्रवादीत सामील झाले होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात विद्यार्थी काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.

महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकाली निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. जगताप यांच्या निधनाने उत्तम सहकारी व मित्र गमावला, अशा शोकभावना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. कोकणात काँग्रेस पक्षाचे संघटना बळकट करण्याचे काम त्यांनी केले. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम त्यांनी केले. पक्षाने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. जगताप यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे व वयैक्तिक माझी मोठी हानी झाली आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो. माणिकराव जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.