माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल
देश बातमी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण; एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. एम्स रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये त्यांना भरती करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्वीट केलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशात निर्माण झालेल्या महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं होतं. त्यातच त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की, लस निर्माता कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीला सरकारने पुढील सहा महिन्यांसाठी आणि किती डोसची ऑर्डर दिली आहे हे सरकारने जाहीर करावे. जर आपण या 6 महिन्यांच्या काळात निश्चित करण्यात आलेल्या नागरिकांचे लसीकरण केले तर आपल्याला आणखी डोसची ऑर्डर देणे आवश्यक आहे. जेणेकरुन लसींचे डोस आपल्याकडे उपलब्ध असतील.

मनमोहन सिंग यांनी सुचवले की, कोरोनाच्या या लसींच्या डोसचे वितरण हे पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे. आपण किती नागरिकांचे लसीकरण केले आहे हे पाहण्याऐवजी आपल्या लोकसंख्येपैकी किती टक्के लोकांचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मनमोहन सिंग म्हणाले होते.