चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
बातमी मुंबई

चेंबूर येथील मुलींच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे मुंबई उपनगर जिल्ह्यात चेंबूर, मुंबई येथे २५० मुलींची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२- २०२३ मध्ये सुरू होणार आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी घाटकोपर येथील इमारत क्रमांक ४ मधील १४ सदनिकांमध्ये या वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थिनींची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वसतिगृह प्रवेशासाठी १ मार्च २०२३ पर्यंत विद्यार्थिंनींकडून अर्ज मागविण्यात आले असून, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. सन २०२२-२०२३ मधील चेंबूर येथील मुलींचे वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत ४ था मजला, चेंबूर, मुंबई, गृहपाल, संत मीराबाई मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, बीडीडी चाळ क्रमांक ११६, वरळी, मुंबई, गृहपाल, गुणवंत मुलींचे वसतिगृह, सर्वोदय नगर, मुलुंड, मुंबई येथे १ मार्च २०२३ पर्यंत होईल. प्राप्त अर्जावरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता अशी :

विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, विद्यार्थिनीकडे उत्पन्नाचा दाखला असावा, विद्यार्थिनी सन २०२२-२०२३ मध्ये महाविद्यायालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावी, विद्यार्थिनी स्थानिक रहिवासी नसावी, विद्यार्थिनीचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. वरीलप्रमाणे पात्र असलेल्या विद्यार्थिनींनी विहीत मुदतीत वसतिगृहात प्रवेश अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.