काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?
देश बातमी

काय सांगता…! सोन्याच्या किमतीत चक्क ९४०० रुपयांची घसरण; पण का?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (ता.१७) सोन्याच्या किमतीत पुन्हा एक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये सतत घसरण होत असून आज मागील आठ महिन्यांमधील नीचांक पातळीवर सोन्याचे दर पोहचले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानुसार, आज सोन्याचे दर १११ रुपयांनी घसरले आहेत. आज दहा ग्राम सोन ४६ हजार ७८८ या दराने विकलं जात आहे. तर दुसरीकडे चांदीची किंमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
तर चांदीची किंमत १३५ रुपयांनी वाढली आहे. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर ६९ हजार ५०७ रुपये प्रति किलो इतका होता. ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ५६ हजार २०० पर्यंत पोहचला होता. तेव्हापासून आजपर्यंत सोनं प्रति तोळा नऊ हजार ४०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. करोना लसीकरणामुळे शेअर बाजारामध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी आपला मोर्चा आता शेअर बाजाराकडे वळवला आहे.

देशामध्ये करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये लसीकरणाच्या माध्यमातून सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. याच गोष्टीचा फटका सोन्याच्या किंमतीला बसला असून सोन्याची जोरदार विक्री गुंतवणूकदारांकडून केली जात आहे. जाणकारांच्या मते, सोन्याची विक्री करुन तो पैसा स्टॉक मार्केटमध्ये टाकण्याचा कल दिसून येत आहे. शेअर बाजारामध्ये अधिक जलद आणि जास्त रिटर्नस मिळत असल्याने गुंतवणूकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. शेअर बाजारात सध्या तेजी असल्याने अनेकांनी तिकडे गुंतवणूक करण्यात येत आहे.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सोनं आणि चांदीवरील आयात करामध्ये मोठी कापत करण्याचा घोषणा केली होती. सध्या सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कावर १२.५ टक्के आयात कर द्यावा लागतो. त्यामध्ये पाच टक्के कपात झाल्यास तो ७.५ टक्क्यांवर येईल. सोनं आणि चांदीवरील आयात कर पाच टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे.