दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले आहे. कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे विविध दुर्घटनामंध्ये आत्तापर्यंत राज्यात ५० हून अधिक मृत्यू झाले असून मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच पुराच्या पाण्यातअनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर गावात दरड कोसळून तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सात ते आठ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचे वृत्त आहे. यात सुमारे २० घरांचेही नुकसान झाल्याचे समजते आहे. या बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोसरे बौद्धवाडी येथे तब्बल १७ जण दरडीखाली अडकले. तसेच तर बीरमणी येथे दोघाचा मृत्यू झाला आहे.