दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…
बातमी विदेश

दिशा रवीच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गची पहिली प्रतिक्रिया; अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि…

नवी दिल्ली : टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेवर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने प्रथमच भाष्य केलं आहे. टूलकिटमध्ये बदल करून ती पुढे पाठवल्याचा आरोप दिशावर असून, सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. दिशाच्या अटकेवरून ग्रेटानं लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिशाच्या अटकेवर ग्रेटा थनबर्गने पहिल्यांदाच ट्विट केलं आहे. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि एकत्र येऊन शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा वादातीत मानवाधिकार आहे. हे कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत अंग असायलाच हवेत,”, असं ग्रेटानं ट्विट करून म्हटलं आहे. दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना ट्वीट केलेल्या टूलकिटचा एक भाग दिशा रवीने संपादित केल्यामुळे देशविरोधी कटकारस्थान रचल्याचा आरोप रवी दिशावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी दिशा रवी या कार्यकर्तीला बंगळुरूतील तिच्या राहत्या घरातून अटक केली.

त्यानंतर तिला दिल्लीतील पटियाला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. न्यायालयानं दिशाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात ‘दिल्ली पोलिसांनी माझे व्हॉट्सअप चॅट किंवा प्रकरणाशी संबंधित इतर कोणतीही गोपनीय माहिती लीक करू नये, असे निर्देश न्यायालयाने द्यावेत’, अशी मागणी करत दिशा रवीने देखील दिल्ली पोलिसांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने दिल्ली पोलिसांना पत्रकार परिषदांमध्ये माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, असं करताना दिशा रवीच्या कोणत्याही अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याची देखील तंबी न्यायालयाने दिली आहे.

दिशा रवीविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या तपासाबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त पूर्वग्रहदूषित असल्याचे सूचित होत आहे, असे मत व्यक्त करत दिशाची दिल्लीतील न्यायालयाने शुक्रवारी तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याआधी तिची पाच दिवस पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली. ती मुदत संपल्यानंतर पोलिसांनी तिला न्यायालयासमोर हजर केले तेव्हा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आकाश जैन यांनी तिची तीन दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.