धक्कादायक! राष्ट्रपतींची घरात घुसून हत्या, पत्नी गंभीर जखमी
बातमी विदेश

धक्कादायक! राष्ट्रपतींची घरात घुसून हत्या, पत्नी गंभीर जखमी

पोर्ट ओ प्रिन्स: कॅरेबियन देश हैतीच्या राष्ट्रपतींची जोवेननल मोसे यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली आहे. हैतीच्या पंतप्रधानांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. राष्ट्रपती मोसे यांच्या खासगी निवासस्थानी काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हैतीचे अंतरीम पंतप्रधान क्लाउड जोसेफ यांनी बुधवारी सांगितले की, एका गटाने राष्ट्रपती मोसे यांची हत्या केली. त्यांच्या खासगी निवासस्थानावर काही अज्ञात गटाने रात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात मोसे यांच्या पत्नी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान जोसेफ यांनी या हल्ल्याचा निषेध करताना म्हटले की, हे कृत्य अतिशय निंदनीय, अमानवीय आहे. हैतीच्या राष्ट्रीय पोलिसांनी आणि अन्य अधिकाऱ्यांनी देशभरातील परिस्थितीला नियंत्रणात ठेवले आहे. देशातील आर्थिक व राजकीय अस्थिरता कायम ठेवण्यासाठी आणि हैतीत सुरू असलेल्या टोळी युद्धातून ही हत्या झाली असावी असे म्हटले जात आहे. मोसे यांच्या कार्यकाळात देशात अस्थिरता आणि असंतोष मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आर्थिक, राजकीय आणि सामाजिक संकट अधिक गडद झाले आहे. राजधानी पोर्ट ओ प्रिन्समध्ये टोळी युद्धातही वाढ झाली आहे.

त्याशिवाय, देशात महागाई वाढत असून या कॅरेबियन देशामध्ये अन्नधान्य आणि इंधन टंचाई जाणवू लागली आहे. हैतीतील जवळपास ६० टक्के जनतेचे प्रतिदिन दोन डॉलरपेक्षाही कमी उत्पन्न आहे. हैतीमध्ये २०१० मध्ये मोठा भूकंप आला होता. त्यानंतर २०१६मध्ये आलेल्या मॅथ्यू वादळामुळे मोठे नुकसान झाले होते. देशात निवडणुका घेण्यास राष्ट्रपती मोसे अपयशी ठरले होते. दोन वर्षांपासून अधिक काळ न्यायालयाच्या आदेशानुसार देशातील सरकार चालवत होते. त्यामुळे संसद भंग झाली.