बातमी मुंबई

मुंबईत पावसाचा जोर वाढला; पुढील तीन दिवस धोक्याचे

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. देशभर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत मात्र, धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत अखंडपणे पाऊस कोसळत असून, शनिवारपासून जोर वाढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होत असून, बुधवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईशहरासह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *