पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता
बातमी महाराष्ट्र

पुढील ४८ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळ निवळून त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुलाब चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे.

त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. पुढील ३-४ तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.