पुढचे चार दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी
कोकण बातमी

पुढचे चार दिवस महत्वाचे; मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी

मुंबई : मुंबईत दाखल झालेला मान्सून आपलं रौद्ररुप दाखवत असतानाच आता मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चार दिवस मुंबईत धुवांधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन झालेलं आहे. अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.