ये तो बस ट्रेलर है… दिल्ली बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या लिफाफ्यात मोठा खुलासा
देश बातमी

ये तो बस ट्रेलर है… दिल्ली बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या लिफाफ्यात मोठा खुलासा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इस्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या स्फोटानंतर झालेल्या तपासात एक मोठी माहिती समोर आली आहे. स्फोटाशी संबधित एक लिफाफा सापडला असून यात स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आले आहे. या लिफाफ्यात 2020 मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख आहे. त्याचबरोबर, हा स्फोट म्हणजे ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले असून बदल्याची भाषा करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लिफाफ्यातून समोर आलेल्या माहितीनंतर, या घटनेमागे इराण कनेक्शन असल्याची शंका बळावली आहे. तर तपास यंत्रणा या लिफाफ्याची टच डीएनए करणार आहे. त्याचबरोबर इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. या घटनेसंदर्भात परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांना नियमितपणे अपडेट दिले जात असून त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेशही दिले आहेत.

तर सध्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर सध्या संशयितांची रेखाचित्र तयार करण्यात येत आहेत. या कारचा क्रमांक शोधण्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचाही या तपासादरम्यान आधार घेण्यात येणार आहे. अद्यापही या घटनेमध्ये कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं वारंवार गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून मिळणारा सतर्कतेचा इशारा आणि त्यानंतर घडलेली ही घटना पाहता राजधानी आणि संपूर्ण देशातच सावधगिरीची पावलं उचलली जाऊ लागली आहेत. तसेच, कमी तीव्रतेच्या या स्फोटाच्या माध्यमातून फक्त नागरिकांमध्ये भीती निर्माण करणं हाच हेतू असल्याची माहिती सुरुवातीच्या तपासातून समोर येत आहे.

दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले आहेत. “दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांशी चर्चा करून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले,” असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. तसेच ” राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.