राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका
बातमी महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत असं स्पष्ट करतानाच राज्यपालांना देखील मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यामुळे आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यपाल काय भूमिका घेतात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयानंतर एकीकडे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्यपालांच्या भूमिकेविषयी मुद्दा उपस्थित केला असताना विरोधकांनी मात्र राज्यपालांना आदेश देता येणार नाहीत, या न्यायालयाच्या भूमिकेवरून बाजू लावून धरली आहे.

यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्तींनी संतुलित मात्र स्पष्ट अशी टिप्पणी केली. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे न्यायालय राज्यपालांना आदेश देऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. मात्र, मंत्रिमंडळाने दिलेला प्रस्ताव राज्यपाल अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेऊ शकत नाहीत, असं न्यायालयानं यावेळी नमूद केलं.