मे महिना सर्वात घातक; महिनाभरात लाखाहून अधिक मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मे महिना सर्वात घातक; महिनाभरात लाखाहून अधिक मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत कोरोनाच्या बाबतीत मे महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी असला तरी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मृत्यूदर वाढल्याचं दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ५८,४३१ जणांचा मृ्त्यू झाला. तेव्हा मृत्यूदर १.०६ टक्के इतका होता. मात्र पुढच्या १४ दिवसात म्हणजे १६ मे ते २९ मे दरम्यान हा मृत्यूदर १.७३ टक्के नोंदवला गेला आहे. या कालावधीत ५५,६८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मे २०२१ या महिन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद केली गेली आहे. महिन्याभरात १.१४ लाख लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. मे महिन्यात दर दिवसाला ३ हजार ९३५ जणांचा मृत्यू झाल्याचं या आकडेवारीवरून समोर येत आहे. देशातील आतापर्यंतचा मृत्यूदर १.१७ टक्के इतका आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूदरही आटोक्यात येईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने मृत्यूदरही कमी होईल असं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर देशात लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.