पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध
पुणे बातमी

पुण्याच्या नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता; राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडच्या मागणीला हिंदू महासंघाचा विरोध

पुणे : औरंगाबादचे नामांतर संभाजी नगर करावे यासाठी अनेक दिवस लढा सुरु होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी जोर धरत आहे. या नामांतराच्या वादात आता पुण्याचे देखील नाव बदलण्याची मागणी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुण्याचे नाव ‘जिजाऊ नगर’ करावे अशी मागणी केली आहे. तर संभाजी ब्रिगेडने पुण्याचे नाव जिजापूर करावे अशी मागणी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण ‘जिजाऊ नगर’ व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दुसरीकडे, पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुणे शहर वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.

मात्र, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडच्या पुण्याच्या नामांतराच्या मागणीला हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी विरोध केला आहे. ‘आधी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी इस्लामपूरचे नाव बदलावे नंतर राष्ट्रवादीने पुण्यात हाथ घालावा. २० वर्ष सत्ताधारी असताना यांना हे असं काही सुचलं नाही. विरोधात बसलं की नको त्या गोष्टींचे राजकारण करायची सवय आता सोडावी.’ असं हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीच नाही तर संभाजी ब्रिगेडच्या मागणीला देखील दवेंनी विरोध केला आहे. पुण्याच्या नामांतराची गरज नाही. जिजाऊंचं भव्य आणि वेगळं स्मारक उभारा आणि ते लाल महाल येथे उभारा. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत आणि पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदलले नाही. त्यापेक्षा पुण्यश्वर महादेव त्या दरग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडने आमच्याबरोबर यावे राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असे आनंद दवे म्हणाले आहे. त्यामुळे आता पुण्याच्या नामांतराचा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.