धक्कादायक ! वाळू माफियांकडून जि. प. अध्यक्षास बेदम मारहाण
बातमी मराठवाडा

धक्कादायक ! वाळू माफियांकडून जि. प. अध्यक्षास बेदम मारहाण

हिंगोली : महाराष्ट्रात गुन्हेगारी प्रवृत्ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढली असून महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का? असा प्रश्न पडू लागला आहे. वाळू माफियांकडून हिंगोलीच्या जिल्हा परिषद अध्यक्षास बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले गावाकडून जिल्हा परिषदेच्या शास्त्रीनगर भागातील त्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे सरकारी वाहनात येत असताना, समोरून येणार्‍या वाळूच्या टिप्परने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. एवढच नाहीतर अध्यक्षांना गाडी बाहेर ओढून बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली. या मारहाणीत बेले यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी भरदिवसा घडली असून अध्यक्षांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले हे त्यांच्या गावाकडून शासकीय वाहनाने शास्त्रीनगर भागात असलेल्या त्यांच्या निवासस्थानाकडे येत होते. दरम्यान, तहसील कार्यालयासमोरील पुलाजवळील वळणाकडून वाळूने भरलेले एक टिप्पर क्रमांक एम. एच. १२ एच. डी. ३१५६ हे त्यांच्याविरूद्ध दिशेने येत होते. जिल्हा परिषद अध्यक्षांनी वळणावर त्यांच्या निवासस्थानाकडे वळण्यासाठी हात दाखविला मात्र टिप्पर चालकाने बेले यांच्या शासकीय वाहनावर टिप्पर नेले. तर, जिल्हा परिषद अध्यक्षांचे वाहन हे एका बाजुला कमी वेगात असल्यामुळे त्यांना इजा झाली नाही. यानंतर या टिप्परमधील व्यक्तींनी खाली उतरून जिल्हा परिषद अध्यक्ष बेले यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे असे बेले यांनी सांगितल्यावरही वाळू माफियांनी त्यांचे काहीही एक न ऐकता त्यांना बेदम मारहाण केली.