उत्तर महाराष्ट् बातमी

मशिदी उघडणार म्हणण्याची इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते?

नाशिक : नाशिकमधील काही साधू, महंतांनी एकत्र येत राज्यसरकारला 29 ऑगस्टपर्यंत मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करु, असा इशाराही दिला आहे. तर विरोधी पक्ष भाजपचाही या घंटानाद आंदोलनाला पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. साधू, महंतांच्यावतीने अध्यात्मिक समनव्य आघाडीचे समन्वय आचार्य तुषार भोसले यांनी भूमिका मांडली. राज्यात मदिरा सुरु आहे, पण मंदिरं मात्र बंद आहेत, असं मत मांडत साधू महंतांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ अशी हाकही यावेळी देण्यात आली. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी आहे, असं म्हणत अध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास गणेश विसर्जनानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, असं तुषार भोसले यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावेळी साधू महंतांच्या प्रतिनिधींनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही टीका केली. मशिदी उघडणार असं म्हणण्याची खासदार इम्तियाज जलील यांची हिंमत कशी होते, असा सवालही या साधू महंतांनी विचारला. तर दुसरीकडे औरंगाबादचे खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारला इशारा दिला.”राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू, ” असे ट्वीट जलील यांनी केले आहे.

“जेव्हा व्यवसाय, कारखाने, बाजारपेठा उघडल्या जातात, आणि बस, ट्रेन तसेच विमानाची उड्डाणे सुरु होतात, तेव्हा कोरोना फक्त धार्मिक स्थळांवर पसरेल, असे सरकारला कोणी सांगितले? सरकारच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या मद्यविक्रीची दुकानेही उघडली जातात आणि मर्यादित संख्येने लोक लग्नासाठी एकत्र येऊ शकतात, तर केवळ धार्मिक स्थळे बंद का?” असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सर्व जण आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सहा महिने थांबलो आणि सरकारला सहकार्यही केले. आता सर्व काही उघडलेले असताना फक्त धार्मिक स्थळे का बंद ठेवली जात आहे? अतार्किक. एक सप्टेंबरपासून सर्व मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला माझा अल्टीमेटम आहे आणि आम्ही दोन सप्टेंबरपासून सर्व मशिदी उघडणार आहोत.” असे ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत