तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड
देश बातमी

तुम्ही आयकर भरत आहात; तर ३१ डिसेंबरआधी करा हे काम अन्यथा होईल १० हजारांचा दंड

मुंबई : तुम्ही आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी असून ३१ डिसेंबरआधी तुम्ही आयकर भरणे आवश्यक आहे अन्यथा अन्यथा तुम्हाला १० हजारांचा दंड होऊ शकतो. देशामधील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने या वर्षी अनेकदा आयकर भरण्यासंदर्भातील कालावधीमध्ये वारंवार करदात्यांना दिलासा दिला आहे. वैयक्तिक आयकरदात्यांना २०१९-२० या वर्षातील कर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वेळेत आयकर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. त्यामुळेच यंदा वाढून दिलेल्या कालावधीमध्ये म्हणजेच ३१ डिसेंबरच्या आधी आयकर भरला नाही तर करदात्यांना १० हजार रुपये विलंब शुल्क म्हणजेच लेट फीज म्हणून आकारले जातील. त्याचबरोबर पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना विलंब शुल्क म्हणून एक हजार रुपये भरुन मुदत उलटल्यानंतर आयकर भरता येईल.

केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) त्यावेळी असं म्हटलं होतं की, करोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे. त्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना दिलासा देत ही तारीख ३१ डिसेंबर अशी निश्चित केली. सर्व करदात्यांना आयकर परतावा भरणं बंधनकारक असतं. ऑफलाइन, ऑनलाइन आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने आयकर भरता येतो. यापैकी ऑफलाइन पद्धतीने सर्व प्रकारचे आयकर फॉर्म भरता येतात. तसेच ऑनलाइन आयकर परताव्यामध्ये केवळ फॉर्म एक आणि फॉर्म चारच भरता येतो.

करदात्यांच्या सोयीसाठी सॉफ्टवेअरच्या मदतीनेही आयकर भरण्याची सोयही आयकर विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. जावा किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये हवा तो फॉर्म डाऊनलोड करुन तो ऑफलाइन पद्धतीने भरता येतो. त्यानंतर एक्सएमएलसाठी नोंदणी करुन ई-फायलिंग पोर्टलवर लॉगइन करुन तो फॉर्म अपलोड करता येतो. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व प्रकारचे फॉर्म भरता येतात.