देशातील आकडेवारीने मोडले जागतिक रेकॉर्ड; नको असलेले विक्रम भारताच्या नावावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील आकडेवारीने मोडले जागतिक रेकॉर्ड; नको असलेले विक्रम भारताच्या नावावर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे नवनवीन आकडे समोर येत असून कोरोनाचा एकप्रकारे कहर सुरु आहे. कोरोना रुग्णांचा नकोसा विक्रम आता देशाच्या नावावर झाला आहे. मागील २४ तासांत देशात ४ लाख १२ हजार ६१८ रुग्णांची नोंद झाली आहे. देशात दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेला आहे. यापूर्वी ३० एप्रिलला देशात कोरोनाची बाधा ४ लाख २ हजार ३५१ जणांना झाली होती. बुधवारी एका दिवसात ३ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३ लाख २९ हजार ११३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत देशात २ कोटी १० लाख ७७ हजार ४१० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १ कोटी ७२ लाख ८० हजार ८४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर २३ हजार १६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात सध्या ३५ लाख ६६ हजार ३९८ करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत १६ कोटी २५ लाख १३ हजार ३३९ जणांचं लसीकरण केलं असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य खात्यानं दिली आहे. देशातील १२ राज्यात १ लाखांहून अधिक, ७ राज्यात ५० हजाराहून अधिक आणि १५ राज्यात ५० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण आहेत. २४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात १५ टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. देशात कोरोनाचे प्रत्येक दिवशी २.४ टक्के वेगाने रुग्ण वाढत आहेत.