दिलासादायक! देशात मागील २ महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात मागील २ महिन्यांतील सर्वात कमी कोरोनाग्रस्तांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या लाटेला ओहोटी लागली असून मागील ६० दिवसांतील सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासांत १ लाख १४ हजार ४६० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, गेल्या दोन महिन्यांतील ही सर्वात कमी संख्या आहे. यावेळी बाधितांचे प्रमाण ५.६२ टक्क्य़ांपर्यंत घसरले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना संसर्गाच्या नव्या प्रकरणांमुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८८ लाख ०९ हजार ३३९ इतकी झाली आहे. या कालावधीत २हजार ६७७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. जो गेल्या ४२ दिवसांतील सर्वात कमी आकडा आहे. यामुळे कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा ३ लाख ४६ हजार ७५९वर पोहचला आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या १५ लाखांहून कमी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. यापूर्वी ६ एप्रिलला २४ तासांच्या कालावधीत एकूण ९६ हजार ९८२ कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.

चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी होऊन ते ५.६२ टक्क्य़ांवर आले आहे. सलग १३ दिवस ते १० टक्क्य़ांहून कमी राहिलेले आहे, असेही मंत्रालयाने सांगितले. कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या १४ लाख ७७ हजार ७९९ पर्यंत, म्हणजे एकूण प्रकरणांच्या ५.१३ टक्क्य़ांपर्यंत कमी झाली आहे. तर बरे होण्याचे प्रमाण वाढून ९३.६७ टक्के झाले आहे.