दिलासादायक! देशात काही प्रमाणात दुसरी लाट ओसरतेय
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात काही प्रमाणात दुसरी लाट ओसरतेय

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रुग्णसंख्येचा देशात विस्फोट झाला. फेब्रुवारीपासून देशातील परिस्थिती भयावह होण्यास सुरूवात झाली. मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यूचं तांडवच बघायला मिळालं. देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हं आकडेवारीतून दिसत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या २४ तासांत मागील ४६ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात एक लाख ६५ हजार ५५३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन लाख ७६ हजार ३०९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. सध्या देशात २१ लाख १४ हजार ५०८ रुग्ण उपचार घेत आहेत. २४ तासांत आढळून आलेले रुग्णसंख्या ही ४६ दिवसांनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

कोरोना रुग्णवाढीबरोबरच देशातील मृतांची वाढत्या संख्येनं काळजी वाढवली होती. देशात दिवसाला साडेचार हजार मृत्यू नोंदवले गेले. काही आठवडे देशात दिवसाला साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोपच उडाली होती. मात्र, आता हळूहळू रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ हजार ४६० रुग्णांचा मृत्यू झाल्यांची नोंद झाली आहे. मात्र, मृत्यूंचा हा आकडा अजूनही चिंताजनकच आहे.