देशात आणि राज्यात मागील २४ तासांत कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात आणि राज्यात मागील २४ तासांत कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : कोरोनाची देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. अंत्यसंस्कारासाठी अनेक ठिकाणी मृतदेहांच्या रांगा लागत असून, महामारीचं संकट आणखी गडद झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात मागील २४ तासांत २ लाख ६१ हजार ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत १ लाख ३८ हजार ४२३ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशासाठी चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येत २४ तासांतच मोठी वाढ झाली आहे. देशात १ हजार ५०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १ लाख ७७ हजार १५० वर पोहोचली आहे.

देशात महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात शनिवारी (१७ एप्रिल) दिवसभरात ६७ हजार १२३ कोरोनाबाधित आढळून आले. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ असून, ४१९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.५९ टक्के इतका आहे. तर आजपर्यंत ५९ हजार ९७० रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६,४७,९३३ रुग्ण उपचार घेत आहेत.