नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना संसर्ग
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ब्रिटनमधून आलेल्या सहा जणांना संसर्ग

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. तर तो आणखीनच वाढला आहे. नव्या प्रकाराच्या कोरोनाचा भारतात शिरकाव झाला असून वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही शिरकाव केला आहे. देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले सहा रुग्ण आढळून आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनानं भारतात पाऊल ठेवलं आहे. २५ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते.

यात सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.