मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे
देश बातमी

मोठी बातमी ! लसीकरणात भारत पहिल्या स्थानावर; अमेरिकेलाही टाकले मागे

नवी दिल्ली : २१ जूनपासून भारतात १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सरकारकडून मोफत लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढला असून पहिल्याच दिवशी ८३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं होतं. ताज्या आकडेवारीनुसार भारतानं डोसच्या संख्येमध्ये अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात आज २८ जून २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ३२ कोटी ३६ लाख ६३ हजार २९७ लसीचे डोस दिले आहेत. यानंतर केंद्रातील सर्व मंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट केले. पंतप्रधान मोदींनी देखील लसीकरणाची आकडेवारी ट्विट करत भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत सर्वाना मोफत लस देण्यात येणार असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. भारतातील लसीकरण मोहिमेला वेग येत आहे! ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन. सर्वांसाठी मोफत लस हे आमचे वचन कायम आहे. सर्वांना लस, मोफत लस असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले होते. दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हा जगात सर्वाधिक लसीकरणाचा आकडा असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं वर्णन केलं आहे.

लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक (३२,३६,६३,२९७) लसीचे डोस देण्यात आले असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजपर्यंत सर्व प्रकारच्या लसींचे मिळून ३२ कोटी ३३ लाख २७ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन (७ कोटी ६७ लाख ७४ हजार ९९०), जर्मनी (७ कोटी १४ लाख ३७ हजार ५१४), फ्रान्स (५ कोटी २४ लाख ५७ हजार २८८) आणि इटली (४ कोटी ९६ लाख ५० हजार ७२१) या देशांचा क्रमांक लागतो.