दिलासादायक! देशात मागील ४ महिन्यांतील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक! देशात मागील ४ महिन्यांतील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या २४ तासात देशात १२५ दिवसातील सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. देशात गेल्या २४ तासात ३० हजार ९३ कोरोना रुग्ण आढळले. तर ४५ हजार २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ३७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ६ हजार १३० बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आतापर्यंत देशात ३ कोटी ११ लाख ७४ हजार ३२२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ३ कोटी ०३ लाख ५३ हजार ७१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ४ लाख १४ हजार ४८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने सापडत असलेल्या कोरोना रुग्णात ८० टक्के जणांना डेल्टा या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, असे सार्स सीओव्ही जिनॉमिक्स कॉन्सर्टियमचे सह अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी सांगितले आहे. रुग्णांची संख्या जर नवीन उपप्रकार आले तर वाढू शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

२४ दिवसांत ३० ते ४० कोटी लोकांचे लसीकरण
सर्वाना मोफत लस मोहिमेत गेल्या २४ दिवसांत ३०-४० कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून याउलट आधीच्या काळात १० कोटी लोकांचे लसीकरण करण्यास ८५ दिवस लागले होते असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. ते म्हणाले की, कोविड १९ लसीकरणात २१ जूनपासून नवा टप्पा सुरू होत आहे. जास्त लशी उपलब्ध करून मोहीम राबवण्यात येणार असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी त्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. केंद्र सरकार खरेदी व पुरवठा करताना ७५ टक्के लशी यापुढील काळात मोफत देणार आहे. भारतात ४०.६० कोटी लोकांचे लसीकरण झाले असल्याचे सोमवारच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.