महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…
बातमी महाराष्ट्र

महापरिनिर्वाणदिनी जयंत पाटलांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र; म्हणाले…

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक पत्र लिहले आहे. त्यांनी या पत्राद्वारेच बाबासाहेबांना अभिवादन केले असल्याचेही म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जयंत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लिहलेल्या पत्रातील मजकूर

प्रिय बाबासाहेब,
देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी आम्ही अविरत कार्य करू हे आमचे ध्येय आहे. उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा एक प्रबळ वारसा आहे. या विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!
आपला, जयंत पाटील.

वरील पत्र फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत पाटील यांनी सोबत #drbabasahebambedkar #ThanksAmbedkar #BabasahebAmbedkar #MahaparinirvanDin असे हॅशटॅगही वापरले आहेत.