मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा
देश बातमी

मोठी बातमी : जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी होईल परीक्षा

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक गोष्टींना ब्रेक लागला होता. पंरतु आता सर्वकाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आयआयटीसह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात जेईई मेन्स वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर ४ ते ५ दिवसात निकाल जाहीर होईल. जेईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं आहे.

मागील शैक्षणिक सत्रात जेईई व नीट परीक्षांच्या काळातच कोरोनाचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. विशेष म्हणजे परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली होती. त्यावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत रणकंदन झालं होतं. मात्र, आगामी वर्षासाठी सरकारनं आधीच नियोजन करत परीक्षेचं वेळापत्रक निश्चित केलं आहे. नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं असल्याने आता विद्यार्थ्यांची लगबग सुरु झाली आहे.