कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; बीएस येडियुरप्पाचां इशारा
बातमी महाराष्ट्र

कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही; बीएस येडियुरप्पाचां इशारा

बेळगाव : “कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही,” असे म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. संवेदनशील महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर बेळगावसह अनेक ठिकाणी सोमवारी (18 जानेवारी) निषेध व्यक्त करण्यात आला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी म्हंटले आहे की, ” “कर्नाटकची एक इंचही जमीन महाराष्ट्राला दिली जाणार नाही. उद्धव ठाकरे केवळ राजकारणासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे मला दु:ख झालं. यामुळे सध्याचं सौहार्दाचं वातावरण बिघडू शकतं. मला आशा आहे की, एका खऱ्या भारतीयाप्रमाणे उद्धव ठाकरे संघराज्याच्या सिद्धांतांच्या प्रति कटिबद्धता आणि सन्मान दाखवतील. कर्नाटकात मराठी भाषिक सौहार्दाने कन्नडिगांसह राहत आहेत.”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 16 जानेवारी रोजी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अभिवादन संदेशात म्हटलं होतं की, “सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत.”

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकात विरोध पाहायला मिळाला. त्यानंतर “बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. जो मुद्दा अनेक वर्षांपूर्वीच सुटला आहे, तो पुन्हा भडकावण्याचा प्रयत्न करु नये. उद्धव ठाकरे केवळ शिवसैनिक, पक्षप्रमुखच नाही तर एक जबाबदार मुख्यमंत्री देखील आहेत.” असा इशाराच काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी दिला.
तर, “उद्धव ठाकरे अतिरेक्यासारखी भाषा बोलत आहेत. कर्नाटकचा भाग महाराष्ट्रात सामील करणारं त्यांचं वक्तव्य हे चीनच्या विस्तारवादासारखंच आहे,” अशी टीका जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर केली.