माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
कोकण बातमी

माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अलिबाग पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या अलिबागमध्ये आंदोलन करत असताना पोलिसाकडून ही कारवाई करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या करत होते. यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या होत्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर केल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्ष त्यांनी वापरली.

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, या प्रकरणाची चौकशी करा या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत होते. यावेळी त्यांनी पोलीस मुख्यालयाकडे जाणारा रस्ता अडवून धरला होता. पोलिसांनी कारवाई करत रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतलं.

दुपारी पावणे बाराच्या सुमारास किरीट सोमय्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाले. नंतर त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. जमीन व्यवहाराची चौकशी करा अशी मागणी करत त्यांनी निदर्शनाला सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाच जणांनाच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेता येईल असं स्पष्ट केलं. मात्र सर्व कार्यकर्त्यांना घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार यासाठी सोमय्या आग्रही होते. काही कार्यकर्त्यांनी बळजबरीने जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला.